← Back to Blog

भीम जयंती काय माहोल होता तो !

भीम जयंती काय माहोल होता तो ! आमच्या बौद्धवाड्यात विहार सुद्धा नव्हतं . पंधरा वीस घरापैकी अर्धी घरं पत्राची तर अर्धी घरं पाचोटा टाकलेल्या ओसरीची होती . आणि या वस्तीच्या मधोमध फक्त एका ओट्यावर एक निळा झेंडा रोवलेला . आणि त्या निळ्या झेंड्याखाली अख्खा बौद्ध वाडा एकत्र येऊन बसायचा . थोड्या अंतरावर एक वाढलेलं पिपंळाचं झाड होतं . वाऱ्यानिशी त्याची पानं हालुन जणु पाऊस पडत असल्याचा रीदम ऐकवीत होता . दर गुरुवारी , दर पौर्णिमेला ही बैठक असायची . बैठकीत बुद्ध , भीम गीत म्हटली जायची फक्त . नागपुर दीक्षाभूमीवर कोणीतरी प्रत्येक वर्षी जायचं . तेव्हा गेल्यावर तिथुनच खुप साऱ्या छोट्या - मोठ्या शाहीर , गीतकार गायकांची भीम बुद्ध गीतांचे छापील पुस्तके आणत . वाड्यातील बायां सगळ्या बिलकुल अडाणी होत्या . पण त्यांची मुलं जी आठवी दहावीला असतील त्यांच्या कडुन त्या गीतांचे बोल पाठ करुन घ्यायचे . आणि मग हे पाठ झालेलं गाणं सामुहिक म्हणायच्या . आठवी दहावीला तिथे शिके पर्यंत अशी कितीतरी गाणी म्हटली त्यांनी जी मला आजही युट्युबवरती ही सापडत नाही . कारण या रिसोर्सलेस कलाकारांच्या कृतीचं चळवळीचं साहित्य म्हणून डॉक्युमेंटशन झालंच नाही कधी . वामन दादा , बोदाडे दादा यांचीच गाणी काही प्रमाणात ऐकायला मिळालीत त्यानंतर . टीव्ही एकाच्याही घरी नव्हता . आणि रात्री नऊ नंतर गावात चिडीचूप शांतता असत . हे रात्रीचे नऊ म्हणजे जसं काही मध्यरात्री असायची . निळ्या झेंड्याखाली एक पिवळा बल्ब आणि बाजुच्या मोडकळीस अवस्थेत आलेल्या घरांची एकमेकांवर , रस्तावर लांब लांब पडलेल्या सावल्या . गावच्या चारबाजुनी अंधार आणि आकाशात ताऱ्यांचा एक ठिगळ , आणि तो पौर्णिमेचा चंद्र . पिंपळाच्या पाणाचां सळसळणारा तो आवाज आणि अशातच सगळं गाव झोपी असताना गावाच्या पल्याड कोपऱ्यात बसलेल्या वस्तीतुन शेतातुन , मजुरी करुन थकुन भागुन आलेल्या आयाबाया भीम राजा की जय , बुद्ध भगवान की जय म्हणत जेव्हा बुद्ध भीम गीताला सुरुवात करत तेव्हा त्या सामुदायिक गीताची पहिलीच ओळ अंगावर काटा फुलवीत होती . तो माहोल बनुन जायचा . हे आमचं विद्यापीठ होतं . येथेच गाण्याच्या ओळीओळीत साठलेला बुद्ध भीम मिळाला . तेव्हा साहित्य नव्हतं , पुस्तक नव्हती , ना मिडिया , ना मला फार काही समज , पण एका कोपऱ्यात भिंतीला पाठ लावुन गप ऐकत बसायचो . पण साहित्याची कमी भरुन काढली , या गीतांनी , आमच्या आयाबायांनी . मोठ्या ताकदीने भीम आमच्यापर्यंत पोहचवला . हे गीतकार , शाहीर , गायक , आमच्या आयाबहीनी यांनी वाहीनी बनुन बुद्ध भीम मोडक्या तोडक्या कल्पनेने पण आमच्याच भाषेत आमच्या सबकॉन्शयस माईंड , सचेतन मेंदुत उतरवला ! आणि येथुन बुद्ध भीम हलनं , हलवनं शक्य नाही . खुप देणं लागतो आपण ज्ञात अज्ञात लोकांचं . ज्यांनी मेनस्ट्रीमला पर्याय शोधुन आपला अस्मिता , अस्तित्व रक्षकांना सदैव जिवंत ठेवलं !! आपली भीम नावाची मातृभूमी शाबुत ठेवली , पुढच्या पिढी साठी !

Comments (0)

No comments yet. Be the first!

Leave a Comment

Related Posts

बुद्ध आणि क्रांतीबा फुले !

आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं आपल्यातलं reading culture तर बाबासाहेबांनीच रुजवलं

बा भीमाच आपली काव्यरचना आहे बाबासाहेब खमके , प्रसंगावधान राखुन कठोरच होते पण कठोरतेच्या गर्भात दडलेले बाबासाहेब प्रचंड भावनिक होते , कितीदा वेगवेगळ्या प्रसंगात अश्रू ढाळले

एका आजी जवळ असलेली बाबासाहेबांची आठवण - भीम जयंती जूने लोक खुप भावनिक आहे बाबासाहेबासोबत