एका आजी जवळ असलेली बाबासाहेबांची आठवण - भीम जयंती जूने लोक खुप भावनिक आहे बाबासाहेबासोबत . माझे आजोबा ( आईचे वडील ) स्वभावाने कठोर होते . त्यांच्या डोळ्यात पाणी कधीच येत नव्हतं . अगदी घरचं कोणी मेलं तरी . वाटायचं हा माणुस भावनांशील नाहीये . पण जेव्हा कधी विहारात , कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलायला लागले , तिथे बाबासाहेबा बद्दल गौरवोद्गार काढता काढता कधी भावनिक होऊन डोळ्यात पाणी आणायचे ते कळत नव्हतं . ६ डिसेंबरला तर विचारुच नका . त्यादिवशी तर दिवसभर शांत उदास बसायचे . आजोबा लहाण असताना जेव्हा बाबासाहेब मिलिंद महाविद्यालय , औरंगाबाद च्या बांधकाम निमित्त मुक्कामी असल्याचे कळाले तेव्हा ते मित्रांसोबत बाबासाहेबांना बघायला म्हणून गावावरून पायपीट करत आले होते . तारेच्या कंपाऊंडवर हात ठेऊन बाबासाहेबांना बघत असताना , बाबासाहेबांनी बोलावलं , इतक्या लांबुन फक्त बघायला आल्याचं कळाल्यावर त्यांना रागवलं होतं . तो प्रसंग आठवुन खुपदा रडले . अशीच एक सरोदे नामक आजी पण आहे . आमच्या विहारात आश्रयाने राहतात विहारात मुलांसोबत . ९० वर्षांच्या आसपास वय असेल तिचं . पण कान व डोळे ठणठणीत . विहारात रविवारी गेलो की तिच्या गप्पा ऐकत बसायचो . विहारात , आजुबाजुच्या वस्तीत मी प्रबोधनाचं काम करतो म्हटल्यावर माझ्या बद्दल आपुलकी होती . मला बाबासाहेबांबद्दल तिला माहीत असलेली गोष्ट सांगावी म्हणून ती एक गोष्ट सांगायची . ती एक गोष्ट मी कितीदा ऐकली , ऐकत आलोय . मागच्या चार पाच वर्षांत भेट नाही झाली तिच्यासोबत . या १४ एप्रिलला तिच्याकडुन तीच गोष्ट ऐकुन घ्यायला जायचं मला . ती अडाणी आहे , निरक्षर . तिला बाबासाहेबांबद्दल खुप बोलायचं पण बोलता नाही येत . त्या एका गोष्टीत तिची बाबासाहेबाप्रति अख्खी अभिव्यक्ती , कृतज्ञता भाव ती व्यक्त करायची . ती गोष्ट अशी होती की , तिच्या लहाण असताना , लग्न होऊन काही वर्षे झाली होती . ती अंजिठ्याला राहत . औरंगाबाद पासुन १०० किलोमीटर . बाबासाहेब औरंगाबादमध्ये येणार होते , औरंगाबादच्या आमखास मैदानावर जाहीर सभा होणार होती . हा निरोप औरंगाबाद लगतच्या सर्व गावागावात पोहचला होता . बुद्ध वाड्यात सभा घेतली . बाबासाहेबांची जाहीर सभा त्यांना ऐकाची होती . विशेष म्हणजे बाबासाहेब दिसतो कसा ? हे बघायची प्रचंड उत्सुकता होती . पायी तीर्थयात्रेला निघाल्या सारखे निघाले होते . हे वर्ष कोणतं होतं तिला आठवत नाही पण तेव्हा मिलिंद महाविद्यालय नव्हतं बहुधा तेव्हाची ही गोष्ट आहे . दीड दोन दिवसांत ते औरंगाबादला रात्री पोहचले . जिथं सभा होणार होती , तिथेच त्या ग्राऊंडवर मुक्काम ठोकला . तिथे त्यांच्या सारखे हजारो लोक होते . ते विस्तीर्ण मैदान , ती चांदणी रात्र , लोकांनी आपलं अंथरूण टाकलेलं , ती चीवचीवाट , जात्यावरच्या ओव्या , आणि उद्या सकाळी बाबासाहेबांना प्रत्यक्ष डोळ्यांनी बघायची हौस !! सकाळ झाली , कार्यक्रमाची वेळ झाली , बाबासाहेबांच्या भाषणात पाच पाच मिनिटाला टाळ्या पडत . बाबासाहेब चिडले की परत भयान शांतता होऊन जात . युद्ध जिंकल्याचा आविर्भावात लोक मैदानावर भाषण ऐकत , ऐटीत उभे होते . बाबासाहेबांच्या अंगावरचा कपडा , कडक आवाजात तर कित्येकांची मरगळ झटकली . दम आला होता सगळ्यात . दुपारची वेळ झाली होती . भाषणांचा कार्यक्रम आटोपला . बाबासाहेब बोलले की जसे बसलात भाषण ऐकाला तश्याच तिथल्या तिथे रांगा करुन सोबत काही भाजी भाकरी आणली असेल तर जेवा आणि लवकर आपल्या घराकडे निघा . उठबस करुन गोंधळ उडवु नका . लोकांनी रांगा टाकल्या , मांडी घालुन बसले पण कित्येक कित्येकांना जेवायला काही नव्हतं . गावाबाहेर गावकीच्या मेहरबानीवर जगणारी लोकं . राहायचे वांदे तिथे खायला काय भेटणार होतं ? बाबासाहेबांची सभा ऐकाला जेव्हा निघाले तेव्हाच यांच्या कडे काही नव्हते . रस्ताने चालताना जे गाव मधात येईल तिथुन काही मागुन भेटलं की खाऊन पुढे निघत . बाबासाहेबांच्या सभेला चाललो म्हटलं की काही आडमुठे लोक शेताच्या बंधाऱ्याच्या रस्ताने पण जाऊ देत नसत . अशी अवस्था असताना सभा संपल्यानंतर कोण काय खाणार होतं ? ही गोष्ट बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा बाबासाहेब स्टेजवरून खाली लोकांच्या रांगेत उतरले होते . म्हतारीच्याच रांगेत खाली लोकांच्या समोर पायेच्या टाचेवर बसले . सगळे बाबासाहेबांकडे बघत होते कुतुहलाने . बाबासाहेबांनी बसलेल्या लोकांना हालहवाल , विचारपूस केली थोडावेळ आणि बोलतानाच आपले दोन्ही हात झपकन तोंडावर लावुन घेतले . बाबासाहेबांचा चेहरा दिसत नव्हता . बाबासाहेबांनी का हात लावले तोंडावर ? का झाकला तो चेहरा !! हे तिला कळालं नव्हतं . आपलं बिऱ्हाड उचलुन घराच्या रस्त्यांनी निघाल्यावर लोक चर्चा करत होते ... बाबा आपल्यासाठीच रडले होते म्हणुन !! We are because he was
एका आजी जवळ असलेली बाबासाहेबांची आठवण - भीम जयंती जूने लोक खुप भावनिक आहे बाबासाहेबासोबत
Comments (0)
No comments yet. Be the first!